सोमवार, ३० जुलै, २०१८

मन मारून तू जगू नको


--------------------------------
अश्रूफुले तुझी ढाळू नको
कुंचली हे दुःख माळू नको

हिरव्या पानांनी भरलेलं
आहेस झाड तू वाळू नको

मन मारून तू जगू नको
नियम कुणाचे पाळू नको

पेटवत राहू दे आग अशीच
बुरुजाचे निखारे गाळू नको

मन असे स्वच्छ घे जाणून तू
वरच्या सुंदरतेला भाळू नको
----------------------------------
३०-७-२०१८
©धनराज भुमरे पाटील
पाचोड, ता.पैठण , जि. औरंगाबाद
7218613434

शनिवार, २८ जुलै, २०१८

हे मन तुटलेलं........सुधारणार नाही

अवती भोवती बरच काही
लिहायला विषय भरपूर
पण काहीच उठवतात
मनातल्या मनात वादळ
असच काहीसं आताही
लिहावं बेधडक
सोपं नसतं हो शब्दांत गुंफने
मनाची पार चाळणीच होते
कित्तेक छिद्र त्यात
ओळखावे लागतात हो
धागे न तुटणारे, काही सुटणारे
गाळून काळजाचं पाणी
उकळून उकळून प्यावं लागतं
तहान भागतच नाही
लिहतच सुटतो बेधुंद
सुंदर ,कुरूप वेडेवाकडे
सगळं हवंहवंसं वाटतं
वेड लागल्यागत झालं
पार बुडालो आता
नाद सुटेल?  वाटत नाही
हे मन तुटलेलं ,
आगीत लोळलेलं
कुणावर भाळलेलं
सुधारणार नाही

©धनराज भुमरे पाटील

बुधवार, २५ जुलै, २०१८

भास तुझा होताना

--------------------------------
जीव टांगणीला
भास तुझा होताना
स्वास घेताना
गहीवरे

आभास कसला
समोर चेहरा हसरा
माळून गजरा
कुंचली

नको आता
यातना मज देऊ
शपथ घेऊ
मनोमनी

वेडेच खरे
शोधी मन शहाणे
विसारण्याचे बहाणे
विरहात

हिरवळ दाटली
मनात माझ्या अशी
दिसते जशी
निसर्गच

गुंतलो कामात
शेतात पाखरे गाणारी
कोवळी आगारी
फुटलेली

दुःख लपवतो
हृदयी घाव गहिरे
कान बहिरे
करोनिया

कविताही रुसली
मन पिंजऱ्यात अडकले
वणवे भडकले
डोळ्यातले

नवीन पहाट
घेतो रोजच मानून
खरेपणा जाणून
नियमाचे

पिकले पान
कधी होते कोवळे 
होती सोहळे
झुळकासंग

----------------------------------
©धनराज भुमरे पाटील
पाचोड ता.पैठण, जि. औरंगाबाद