बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

सावली... भाग २


#सावली , भाग २

दिप्याने आप्पाच्या नजरेआड येऊन पिशीचं तोंड उघडलं त्यात २ पपया अन काही शेरण्या होत्या ,
दिप्यानी पिशवीच्या तोंडाला उज्या हातात पकडून इकडं तिकडं बघत झोपडीकडे निघाला ..

पासुन पुढे.......

शुभ्या जरा हळू चालत होता टाचेला काट्यामुळे रग लागत होती
आमल्या त्याच्याच धुंदीत हातातल्या काठी ने चालता चालता गवताची मुंडकी उडवत होता , तोंड ,ओठ चिकट झाली म्हणून  दोघेही पाण्याकडे निघाले , हे असे डामचे की वाटेणी कधी जात नव्हते ..मधूनच घुसायचे ,
वढा येयच्या आधी म्हसोबा लागायचा पिंपळाच्या मांडीवर आरामशीर बसलेला , तिथली झाडी, झुडपी अगदी दाट होती , भयाण दिसायचं सगळं .. नवीन पाहूणे, माणसं  तिकडे जायला टरकायचे ,
नंतर सुरू होते गायरान , त्या गायरानातून वढा होता , तो अर्ध्या गावाला वळसा घालून पुढे गेलेला ,
दिप्या तसा टरकायचा तिकडं जायला पण सोबती असलं की जायचा ,
हे दोघेही म्हासुबापाशी येऊन ,दिप्याची वाट पाहत काहीतरी उद्योग म्हणून झाडावर लटकलेल्या भोपळ्यावर नेम धरायला लागले ,
दिप्या एक दोन घर माघे टाकून म्हातारीच्या झोपडी पाशी आला झोपडी जरा मॉडर्न असल्यासारखी आप्पाची ची कला त्यात दिसून येत होती ,
म्हातारीला एकुलती एक मुलगी तिचा मुलगा गणाच्या चकरा असायच्या महिन्यातून एक दोन...
गावातली मंडळी ,शेजारी पाजरी , म्हातारीकडं लक्ष द्यायजी,काळजी घ्यायची त्यात आप्पा पहिल्या नंबरावर  ,
आप्पानी बांधलेली ती झोपडी दनगट होती.
मातीच्या भेंड्यानी बांधलेली झोपडी काय घरचं होतं ते,
ना वादळात डगमगायची , ना पावसाळ्यात गळायची .
म्हातारी लय काळजी घ्यायची शेण-सडा , पोतरा वगैरे....
दिप्याने झोपडीत पिशवी ठेवली अन बाहेर येऊन  जरासा ओरडला "आज्जे  पिशवी ठेवली बरं का "
झोपडी माघे आजी हलक्या हाताने नाटी आपटत होती,
तिने दिप्याला हाक मारली " दिपा त्यातली एक घरी नि "
दिप्या " नगं आज्जे राहू दि तुलाच मी अप्पाकडून घेऊन जाईल"
आजी उठून पुढं यायच्या आधी दिप्या फरार झाला ,
आजी पुन्हा गेली मग नाटी धुवायला ,
फाट्यावरून येणारा रस्ता म्हासुबा पर्यंत होता , याला बरेच फाटे फुटले होते सोईनुसार .
घरं संपली अन येणाऱ्या त्याच रस्त्याला पांदी म्हणायचे
पांदीतून दिप्या कधी चालत कधी पळत म्हसुबापर्यंत आला तिथं शुभ्या, आमल्या त्याची वाट पाहतच होते ,
शुभ्या घुबडाच्या डोळांनी पाहणारा आल्या आल्याचं वसकला "आली का भागूबाई भित्री "
आमल्या पण टवकरला आवाजाने " म्हातारीचं लाडकं वासरू आलं का"
दिप्या दम खात खात त्यांच्याकडं पाहत होता .
शुभ्या च्या तोंडाला ओघळ पाहून " थोबाड पुसायला काय होतं रे "
शुभ्या "मुसुम्ब्या खाल्ल्या रे आत्ताच"
आमल्या "तुला नाय भेटणार पळ"
दिप्या "तशी बी मला नाय आवडत ... आंबट मुसुम्बी"
शुभ्या नि मोसंबी खिश्यातून काढून सोलायला लागला,
येणार गंध दिप्याला खुणावत होता मोसंबी गोडच आहे.
आमल्या टकामका बघत असलेल्या दिप्याला पाहून "हाय  हाय गोडच हाय"
दिप्या "अर्धी तरी दि"
शुभ्या "आंबट आहे ना..."
नको नको म्हणत द्यायची होती ती दिली.

शुभ्या "चला आता निघू"
दिप्या " उद्या सर लय मारणार हाय, शाळाला दांडी मारली म्हणून "
आमल्या "तू वाचणार ...आम्ही खाऊत मार"
दिप्या "उद्या सांग काय सांगायचे तर मी मधी पडणार न्हाय "
शुभ्या "हा हा चल आता "
तिघे निघाले वढ्याकडं ,
गायरानात गाई,म्हशी चरत होत्या ,
मंडळी झाडाखाली  बसून लक्ष देत होती,
गायरानात काही फळझाडे पण होती , पाखरांमुळे उगवलेली ,
गायरानातून तिघे वढ्यापाशी आले ,
वढ्याच्या पाण्यात कवड्या चा घोळका खेळत होता बेशरमाच्या झाडाच्या सावलीत  ,
गवत तर अगदी मस्त हिरवेगार , काट्याची झुडपात पालापाचोळा गुतलेला होता,
जांभळाची चांगलीच 4/5 झाडं होती,
शुभ्या झाडावर चढून घोसची घोस खाली फेकली,
दिप्या अन आमल्या खायला तयार होती त्यांना दम थोडीच निघणार ...
शुभ्या काही खायचा अन खाली टाकायचा,
खाली उतरून तिघांनी आपापला वाटा घेतला,
शुभ्यानि आपला सरकार बेल्ट जरा पँटीला व्यवस्थित केला ,
झाडावरून उतरताना पॅन्ट जरा इकडं तिकडं झाली होती.
जरा जरा ऊन पडायला लागले सुटीच्या दिवशी गावातले पोरं इकडेच यायची खेळायला,
तिघेही त्या मोठ्या चिंचेकडे निघाले जिथं पोरं हमखास असायची, जरा वेळ खेळले आणि अंधार पडायचया आधी पुन्हा निघाले गावाकडे,
दिप्या आजी कडे गेला निरोप द्यायचा विसरून गेला होता,
तो सांगून पुन्हा घराकडे निघाला,.....

क्रमशः.....

©धनराज भुमरे पाटील

मैत्रीण

मैत्रीण...

प्रेमळ, गुणी, मनमोकळी
भेटली मला मैत्रीण छान,
ती कल्पनेत भिजवते अन मी
रंगवतो तिला विसरून भान...१

रंगात रंगने तिला आवडते
शब्दात ती अशी बहरते,
स्पर्श हा कोवळ्या पानांचा
रंग जणू सुंदर पंखात भरते...२

मनास जोडते असून दूर जरी
काव्य गुंफण शब्दांची भारी,
निखळ मैत्री आणि मनात
नाती सामावलेली सारी...३

मी पाखरू ! तिने घरटे व्हावे
मी वाटसरू ! तिने वाट व्हावे,
मैत्रीचं हे रोपटे झाड व्हावे
वाढावे, अन घनदाट व्हावे...

©धनराज भुमरे पाटील
7218613434
२८/०८/२०१८

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

मैत्रीण...

मैत्रीण...

प्रेमळ गुणी मनमोकळी
भेटली मला मैत्रीण छान
कल्पनेत भिजवते मज
रंगवतो तिला विसरून भान

रंगात रंगने तिला आवडते
शब्दात ती अशी  बहरते
स्पर्श हा कोवळ्या पानाचा
रंग सुंदर पंखात भरते

मनास जोडते असून दूर जरी
काव्य गुंफण शब्दांची भारी
मैत्री निखळ मैत्री असून
नाती सामावलेली  सारी

मी पाखरू तिने घरटे व्हावे
मी वाटसरू तिने वाट व्हावे
मैत्रीचं रोप हे झाड व्हावे
वाढावे अन घनदाट व्हावे

©धनराज भुमरे पाटील
7218613434
२८/०८/२०१८

गुंफण

तुझ्या बोलण्यात आहे
लौँग्या मिर्चीचा तडका
नजरेत आहे आग
मग उठू दे भडका

आहे निडर वाघीण 
तूच चपळ नागीण
वाट अडवली कुणी
सोडतेस तू कातीन

चंद्रासम शीतल तू
पाण्यासम नितळ तू
कायमच रहा तुझ्या
मतावर अटळ तू

हिरवळ रानात या
बोराटीची कुंपण
रक्षा करते  होऊन
शब्द दगडी गोफण

©धनराज भुमरे पाटील
२८/०८/२०१८

कवितेविना बेरंग सर्व काही

काम नाही तर कल्पना नाही
कल्पना नाही तर शब्द नाही
शब्द नाही तर कविता नाही
कवितेविना बेरंग सर्व काही
©धनु
१८/०८/२०१८

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

सावली

#सावली....

शुभ्या लिंबाच्या झाडाखाली बसून मोसंबी सोलतच होता की कुणीतरी येतंय कळताच त्याने पटकन 3 मुसुम्ब्या गवतात टाकल्या  ....
तिकडुन आमल्या येताना दिसला  अन पुन्हा वाकून गावतातली एक मोसंबी उचलून सोलायला घेतली. अंगठ्यावर जोर देत..."त्यो अजून आला न्हाय का"
दहा पावलावर आलेल्या  आमल्याचं उत्तर .. "त्यो गेला फाट्यावर म्हातारीच काम करायला, लैच लाडका त्यो म्हातारीचा , म्या सटकलो तिथून त्यो यईल मागून"
शुभ्याच्या जवळ येऊन , "मला दि आर्धी"
शुभ्यानी गावताकडे बोट दाखवत "दोन तीन हे, घे तिथून"
आणि फोडलेली मोसंबी खाऊ लागला.
आमल्यानी पण मोसंबी सोलायला सुरवात केली "म्हातारीचं पोरगं शहरातून येत महिन्याला अन दिप्या ला पण काहीना ना काही घेऊन येतं "
शुभ्यानी तोंडातला चोथा थुकून "हा जाऊदि, काटा काढ लय दुखायला "
आमल्या " कोणता खुडला रे"
शुभ्या "भाभळीचा, रामभाऊ च्या बागातुन आणल्या, येतानाच खुडला पांदीत "
आमल्या " बर बर काढतु थांब संपू तर दि आधी"
दोघांनीही मोसंबी खाऊन घेतली अन शुभ्या नी बुड ठेकवलं, उजा पाय उडघ्यावर घेतला .
आमल्यानी सदऱ्याची पिन काढली अन तो पण खाली बसला .
तोंडातला थूका उज्या हातानी शुभ्याच्या टाचीला लाऊन चोळू लागला , जरा भिजल्यावर काटा दिसावा म्हणून नखानी  खाजल्यासारखं करून दातात दाबलेली पिन घेऊन उकरू लागला ,
काटा खोलच रुतला होता .
शुभ्यानी डावा हात घोट्यावर तर दुसरा हात पोटरीवर घट्ट केला ,
आमल्या काटा काढायच्या धुंदीत होता , पिन आत टोचली तसा शुभ्या हुस्स करू लागला ,
काटा काढला रक्त निघालं ...
पण पाणी काही निघाले नाही डोळ्यातून .
आमल्यानी हात सदऱ्याला पुसला,
शुभ्या काटा खुडला होता तिथं दाबत होता ,रक्त येणे बंद होऊन त्याजागी पाण्यासारखं दिसायला लागलं .

इतक्या वेळात बाजूने झाडी असलेल्या  कच्च्या रस्त्याने चालत  दिप्या फाट्यावर पोहचला,
रस्ता जरा ओलाच होता सकाळी पाऊस पडून गेला 11 वाजले तरी सूर्य काही दिसला नव्हता , बैलगाडीच्या चाकाची निशाण ताजी दिसत होती ,
गावाकडून येणारा दिप्या डाव्या हाताला वळून वडाच्या सावलीत येऊन उभा राहिला वड चांगलाच मोठा होता,
वडा खाली लागूनच छोटीशी हॉटेल होती , एका बाजूला गुरांना पाण्यासाठी चांगलाच हौद होता त्यात पाणी एक दिवसाआड आप्पाच भरायचे ,
त्यांची ती हॉटेल मोक्यावर होती
आत  दोन बाकडे  होती, पाचेक माणसे बसतील अशी ,
बाहेर रांजण ठेवलेला त्यात प्यायचं पाणी
अन दुसरा रांजण आतमधी होता मागच्या कुडाच्या डाव्या कोपऱ्यात अन समोर लाकडी टेबल तीन बाजूने पोतं फाडून त्याला खालपर्यंत झाकून घेतलेलं, टेबलावर रॉकेलचा स्टोव ,
आप्पानी गावातल्या पोरांना हाताशी धरून हॉटेल च्या पुढं  वडाच्या खोडाभोवती दगडं रचून उंचीला दोन अडिच फूटाचा गोल  वटा तयार करून घेतला होता वट्याला मातीची भरती होती ,
रोज सकाळी हॉटेल समोर सडा टाकताना त्या वट्यावर पण टाकायचा हा आप्पाचा नित्य नेम,
दिप्याने नजर फिरवली आत कुणी नव्हते ,
बांदावर बैलं  सडक लावून दिलेली होती , गळ्यातल्या घंट्याचा आवाज येत होता , एक गाय पण होती तिच्या घंटीचा आवाज कमीच येत होता , 
जरा बाजूला येऊन मोठ्याने आवाज दिला, " आप्पा "
आप्पा हॉटेलच्या माघे त्यांच्या  शेतात  बाजरीतले  उपटगवत काढत होते याने बैलाला संध्याकाळची वैरण ही व्ह्यायची अन रान ही जरा रिकामं व्ह्यायच , त्यांनी दिप्याचा आवाज ओळखुन बाजरीतून आवाज दिला ,
" काय रे थांब आलोच "
दिप्या "आज्जीने पाठवले "
इतकं बोलून तो वट्यावर बसला , वटाही थोडा ओलाच होता.
पाखरांचा आवाज कानावर पडत होता तसा तो टकामका वर पाहत होता ,
थोड्या वेळात आप्पा आले,  अंगातली बन्यान घामानं ओली झालेली , हौदातल्या पाण्याने हात धुतला अन ओला हाताने चेहऱ्यावर फिरवत " बाकीचे न्हाय का आले , कुठं हिंडायला गेलीत "
दिप्या नी पटकन उत्तर दिले "ओढ्याकडे गेलीत मला पण तिकडेच जायचे आहे ",
आप्पानी माघे माघे यायचा इशारा केला अन ते हॉटेलात जाऊन ,
टेबलाखालून पिशवी काढून दिप्याच्या दिशेने धरली , " पाडू बिडू नको "
दिप्या " नाही आप्पा नेतो जशी दिली तशीच "
आप्पा " म्हातारीला सांग गनुदा या हप्त्यात येईल "
दिप्याला घाई झालेली तो गरबड करत " सांगतो सांगतो , येतो आता "
दिप्याने आप्पाच्या नजरेआड येऊन पिशीचं तोंड उघडलं त्यात २ पपया अन काही शेरण्या होत्या ,
दिप्यानी पिशवीच्या तोंडाला उज्या हातात पकडून इकडं तिकडं बघत झोपडीकडे निघाला ..

क्रमशः....

©धनराज भुमरे पाटील
२५/०८/२०१८

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

श्वास कोंडलेला

बघवेना आजकाल जगात
खूप काही घडते आहे
चिखल तो चिखल नाही
कमळ आता सडते आहे

सामावून घेतले आजवर तिने
श्वास कोंडलेला पाहिला नाही
जन्म दिला ज्याला तोच आता
लेक तिचा लेक राहिला नाही 

©धनराज भुमरे पाटील
२५/०८/२०१८

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

चारोळी संवाद गणेश भोसले -धनराज भुमरे

२३/०८/२०१८
११:०८ रा. , ते ११:३० रा.

काय चालणार भाऊ,
रोजचीच आहे काम
राबतो गुरावाणी
नाही जिवाला आराम
©गणेश भोसले

राबवे लागते गुरावानी
मनास आराम हवा
कामाचा हा घाम
दाखवेल सूर्य नवा
©धनराज भुमरे

हेच आपले जीवन
आपणच जगायचे
मरतो रोजच तरी
खळखळून हसायचे
©धनु

काय करावे आपण
नाही सुख रे जिवाला
राञ राञ झोप नाही
खाते मन मनाला
©गणेश भोसले

दुःखाला मानतो मी
सुखाचे बीज मित्रा
सुगंधित मन हे
करतील चीज मित्रा
©धनराज भुमरे

होते दुखापासुन
सुखाची उत्पती
मन असावे मोठे
असावी निर्मळ वृती
©गणेश भोसले

4

(
अधून मधून होतो संवाद
   याला काव्याची जोड असते
  मन मोकळे होते नकळत
अश्या संवादाला तोड नसते
©धनु   
२४/०८/२०१८
७:५४ स.)

नेत रहा स्वप्न सुंदरी

नेत रहा स्वप्न सुंदरी
प्रेमळ नगरीत दूर
दे शब्दास अर्थ
अन दे मधुर सूर
©धनु
२४/०८/२०१८
१२:०४ am

इशारे

ना माझे तुला , ना तुझे मला
ना इशारे मनास  कळते 
रात्र रात्र जागून झालीत
पुन्हा पुन्हा ही रात्र छळते
©धनु
२३/०८/२०१८

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आवडली त्याला मग भुलवली
कवेत घेऊन कॅमेऱ्यात टिपली
पसरली वाऱ्यागत राख अब्रूची
सुंदर आयुष्याने यमपुरी गाठली

घातच हा प्रेमाचा हळव्या मनाचा
सर्व मानले त्याचेच हे घाव झाले
लोटून दिले काळोखात दुःखाच्या
आता प्रेमाचे भयानक पर्व आले

©धनराज भुमरे पाटील
२१/०८/२०१८

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

छंद

कळले न कधी मज
लागला कधी छंद
निसर्ग रम्य अन
शब्दाची असे धुंद
©धनु
९/८/२०१८

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

दिल

ऐ दिल नही जानता की मै
तुझे खिशियो से कैसे भर दु
मुझमे इतनी हिम्मत भी नही
की तुझे सिने बाहर कर दु
©धनु

१३--८-२०१८

श्रावण

प्रभाती किरणे, पुष्प सुगंधी
अंगणी खेळे नाचत पाखरे
तुळशी भोवती बाळ रांगती
गोठ्यात हंबरती गाई वासरे

श्रावणी चाले जलाभिषेक हा
वेचोनी फुले राऊळात जाया
हिरवळ पसरली चहूकडे
भेटता ही आभाळाची माया

©धनराज भुमरे पाटील

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

तोरण

दिसे छान अंगणी फुले
सुगंध मनमोहक असे
मान दिवाळी ला खास
तोरण जणू ताऱ्यांचे ठसे
©धनु
९-८-२०१८

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

फुलपाखरुच ते गेले उडुनी


वेगळीच होती, ना जास्त गोरी
सावळीच रूपाने, होती हसरी,
बोलक्या नजरेने खुणावत होती
भास तो की, माझीच नजर फसरी...१

अबोल पण मनाने गोंधळलेली
वाटले बोलावे, करावी मैत्री आज,
वाटेवर वाट होती गर्दीत एकटी
साधे पणाचा तसाच होता साज...२

बोलायचे होते, तिलाही न कळले
हाक देताच, पाऊल लडखळले,
थांबली जरा डोळा भीडेपर्यंत
त्यातच माझे ही शब्द अडखळले...३

नजरेत तिच्या थोडा राग होता
अचानक बोलण्याचा जणू वार होता,
फुलपाखरूच ते गेले उडुनी
फुलाविना सुना सुना तो परिसर होता...४
©®
-धनराज भुमरे पाटील
८-८-२०१८

मनमुराद....

मनमुराद.....

उठ , डोकं खुपसून कश्याला बसला ,
चल आपण शांत ठिकाणी जाऊ ,
बघ सूर्य कसा मावळतीला रंग उधळतो
नाही बघायचा का तुला ,
नाही ,
बर सोड जाऊ दे तुला त्यात काहीच दिसणार नाही ,
ज्वाला आहेत धगधगत्या ,
त्याचा दाह होतोय ना ...
तुला ही होतोय पण तो वेगळा ,
नाराजीचे कारण .....
हं एकटा पडलास ना तू
जाऊदे का विचार करतोय ,मी आहे ना तुझ्या सोबत .
मग अजून काय पाहिजे,
माझ्याशिवाय कोण नाही तुझं ,
मित्र कुठपर्यंत सोबत राहतील ,
दिवसा की रात्री ,त्यांना त्यांची कामं नाहीत का ,
कोण रागावले असेल तर बघ ...
ऐकून  घेतील ,
नाही ना ,
नाती काय करायची तुला ,
कोणता आनंद आहे ,नात्यात  सांग मला ,
असं  रंग उडल्यागत नको करू ,
भानावर ये , सांगतो ऐक गपचूप ,
सोडावे लागते सगळे हे ,
शरीराच्या उठणाऱ्या कळाहेत कळा,
उठतात तर उठू दे ,
पालव्या सारख्या फुटतात तर फुटू दे
खुडल्या जातील तोडल्या जातील
अगदी अगदी जाळल्या जातील
जळाल्यातर जळू दे
स्वतःला थोडं कळू दे
या सूर्याला अजून थोडं ढळू दे,
भावनेला वळायचे तसे वळू दे
लोक म्हणतील नालायक
म्हणले तर म्हणू दे ना
तुला काय त्याचे ,
मान पाहिजे का तुला
कश्याला हवा मान
काय खार घालायचा  मानाचा
तुला द्यायचा तर दे ,द्यायला काय कमी नाही ,
मान नाही पाहिजे मला तू असला की बस झाले
मी आहे तुझ्या सोबत ,
मला काही पण बोल तू ,
मला राग नाही ,
तू रागावला माझ्यावर ,
जसे तुझ्यावर रागावतात ना ,
तसाच तू माझ्यावर रागावतो आहे,
त्यांचे सोड ,
बघ माझ्याकडं बघ ,
दिसतो का तुला , नाही ना ,
नाही दिसणार मी कुणालाच , अगदी तुलाही ,
नेहमी बोलत राहीन तुला ,
पाठ नाही सोडणार ,
नाते बिते सोड ,
अन हो मोकळा ,
जग दाखवतो तुला ,
एकटं जग एकटं ,
भेटलच कुणी तर बोल जरा ,
पण खबरदार , मोहात पडशील तर ,
नाते कोणतेही  असो , कायम राहील ना राहील ,
पण आधीच सांगतो ,
माझ्याशिवाय मरेपर्यंत कुणीच नसणार ,
तू मलाही दूर लोटू शकणार नाही त्यांच्या सारखे ,
त्यांनी लोटले ना , तुला नाही जमू शकणार ,
असा अगाध ज्ञान मिळाल्या सारखा गप्प का झाला ,
अजून बरंच राहिले ,
पाहिजे तस राहा कुणाला काही बोलू नको
तुला नाही बोलता येत ,
मग जातात ते हसून तुझ्यावर ,
गप्प राहायचं ,
वाचायचं मस्त शांत रहायचं
डोळे मिटून उगाच बघायचं
गालात हसायचं ,
हसणे रडणे तुला आवडले ,
मला तर काहीच आवडत नाही ,
तुला सुंदर दिसायला आवडत होतं ना ,
बघ 2 महिन्यापासून तू कसा राहतोय तुला माहिती तरी आहे का ,
उठतो अंघोळ करतो ,
जेवतो , शेतात काम करतो ,
अंगावरचे कपडे बघ मातीनं भरलेत
माहिती पण नाही तुला तर ,
कुणी बघितलं का तुझ्याकडे .. कळले का तुला ,
नाही ना , बर झालं नाही कळले ,
हसत होती तुला ,
काय काय बोलत होती ,
पण तुला माहिती नव्हते ना ,
बरंच झाले ,
असंच रहा ,
तू कसाही असला तरी मला आवडतो ,
मस्त जेवत जा ,
तुला  जग दाखवतो ,
या रानात , पानाफुलात ,
या प्रत्येकात जगायचं शिकवतो तुला ,
ही नाती गोती सोड ,
पाखरं घरटं का सोडतात माहितेय का ,
कळेल कळेल ,
ते नाती गोती मानत नाही ,
जगतात हवं तसे मनमुराद ,
तुला ही जगायचं तसेच ,
मी आहेच तुझ्या सोबत ,
काही काळजी नको करू ....

-धनराज भुमरे
८-८-२०१८

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

मीच आहे

मीच आहे
--------------------------------------------------
वासनेच्या उसाला त्या सोलणारा मीच आहे
फसवण्यासाठी गोड बोलणारा मीच आहे

कशास घेऊ नाव दुसऱ्याचे उगाच आता
त्या निरागस मनाला  तोडणारा मीच आहे
--------------------------------------------------
६-८-२०१८
©कवी-धनराज भुमरे पाटील
7218613434

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

कष्टाचा तू खरा मानकरी

कष्टाचा तू खरा मानकरी
-------------------------------
मी तर आहे एक शेतकरी
कष्टाचा तू खरा मानकरी

मैत्रीचं रे नातं आपलं अस
राज्य करतो तू मनावरी

ओढतो नांगर ढेकळात तू
किती भार तुझ्या तनावरी

तू आहे म्हणून भागते माझे
तुझ्यावाचून मी सरणावरी

तुझ्याकडे पाहून जगतो मी
प्रेम झाले रोजच्या मरणावरी

झाडे सुकलेले कोरडे रान होते
रागावतो रे या लहऱ्या घणावरी

खायला घालीन हिरवं तुला
दिवस काढले वाळल्या तणावरी
----------------------------------------
५-८-२०१८
©कवी-धनराज भुमरे पाटील
पाचोड, औरंगाबाद. 7218613434

देवा

देवा तुला भेटायला
लागते तरी काय
हाताचे टाळ की
वेड्या मनाचे  पाय
©धनु

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

ढेकूळ

अहो खूप वारा सुटलाय  सु सु करतोय आणि त्यात जवळच असलेल्या
पिंपळाच्या पानाचा सळसळाट ,
ऊन जरा चांगलेच पडले हो ,
आजू बाजूला हिरवळ तर मनात भरते
पाखरांचा कल्लोळ कानावर ही येतो जेव्हा हा वारा जरासा शांत होतो ,
पुन्हा जोर धरतो थांबून थांबून लहान लेकरागत रडणारा ,
मला जराशी भूक लागली हो ,
उन्हाळ्यात जास्त काम नसते हो मला
आता खूप मुळे आहेत लपेटून करतात माझ्याकडून काहीतरी मिळण्याची आशा ,
खूप हळहळ वाटते ,
महिनाभरा पासून पावसाचा थेंबही अंगावर पडला नाही ,
मी तरी काय देऊ त्यांना ,
कसं समजावू त्याना हा कोरडा जीव कुणाचाही नसतो
मला ही ठेवतील नाव त्या दगडा सारखं ,
व्हावं लागेल मला ओला , तेव्हाच पाझर फुलेल मला .
माझ्यात ती ताकद  नाही अश्रू ढाळण्याची .
तर तेही केले असते त्या माऊली सारख जीव जाळून जाऊन जगवलं असत तुम्हाला ,
हळू हळू तुमची पाने सुकतील , खोडात असलेला ओलावा ही सोसला जाईल जीव आकासला जातो ,
आशा असते ना तुमच्याही मनात येईल पाऊस आणि फुलेल नवी पालवी , सुकलेला पाचोळा जेव्हा अंगावर पडतो ना ...
वाटतं तू ही काळजी घेतो माझा ओलावा ठिकवतो , स्वतःला तोडून माझ्यावर टाकलेली चादर मायेची उबदार कुशीसारखीच आहे ,
बरेच दिवस जातील पाऊस काही येणार नाही असेच वाटतं ,
मग होईल हाड वळल्यागत चामडी चिकटलेली , उपटले जातील नवीन रोपांसाठी ,अन मुळाशी मी लटकला जातो अन फेकलं जातं बांदावर ,
इथंच राहणार... राहणार कुजनारआणि सडणार आणि मलाच वाचवा लागतो हा कस तुमच्या गुणांचा ,
पडला पाऊस तर घेऊन जाईल नव्या पडलेल्या बियांसाठी त्यानातरी पोटभर मिळावं .
उन्हात तापून तापून घ्यावं लागतं तेव्हा कुठं माझ्यातले अवगुण हवेत विरून जातात ,
पहिल्या पावसाच्या  सरी उंगावर पडतात ना इतका आनंदी होतो,
सुगंधात दरवळू लागतो ,
त्या कवीच्या ओळी कानावर पडतात
आनंद आनंदी गडे
हिरवे इकडे तिकडे चोहीकडे
हो मी खरंच खूप आनंदी होतो ,
प्रेमरसात बिजून वाहू लागतो या उंची कडून पायथ्याशी , भरतो ती राहिलेली जागा , घेतो बीज कुशीत ,
तेही प्रेम करतात माझ्यावर... घट्ट बिलगतात भोवती ,
रोपाची झुडपं , झुडपाची झाडं होताना कधी विसरत नाही ते ,
पानावर पडणारा प्रत्येक थेंब चुंबन घेऊन टाकतात .
त्या थेंबतलं ते प्रेम अजून प्रेमळ होत जातं ,
आणि वेळो वेळी तोडून स्वतःला टाकतात अंगावर ती उबदार चादर , प्रेमाचा ओलावा टिकवणे हे त्यांच्या कडून शिकावं लागेल .
मी ढेकूळ ....ओळखता ना मला ...
------------------------------------------------------------------
४-८-२०१८
©कवी-धनराज भुमरे पाटील
पाचोड , औरंगाबाद
7218613434

बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

असा माझा बळीराजा

असा माझा बळीराजा
-------------------------------
निसर्गच त्याची शाळा
नका हो समजू भोळा
माया फार त्याची बघा
बैल तोच वंदी पोळा

नाम घोष ध्यानी मनी
विठू माऊलीचा लळा
पहाटे करे शेण पाणी
फुलवतो छान मळा

बघा कसा भरदार
रानी हाके बैल काळा
चाले नादात डौलत 
वाजे घुंगराच्या माळा

हसे भरल्या पिकात
रानातले ते पाखरु
काळ्या आईचे लाडकं
जसं गाईचं वासरू

असा माझा बळीराजा
मोती असे त्याचे धान्य
घेती बेभाव सगळे
मोल नसे कुना मान्य
--------------------------------
©कवी-धनराज भुमरे पाटील
०१-०८-२०१८
मु.पो. पाचोड, ता. पैठण, जि. औरंगाबाद
मो-7218613434