बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

मनमुराद....

मनमुराद.....

उठ , डोकं खुपसून कश्याला बसला ,
चल आपण शांत ठिकाणी जाऊ ,
बघ सूर्य कसा मावळतीला रंग उधळतो
नाही बघायचा का तुला ,
नाही ,
बर सोड जाऊ दे तुला त्यात काहीच दिसणार नाही ,
ज्वाला आहेत धगधगत्या ,
त्याचा दाह होतोय ना ...
तुला ही होतोय पण तो वेगळा ,
नाराजीचे कारण .....
हं एकटा पडलास ना तू
जाऊदे का विचार करतोय ,मी आहे ना तुझ्या सोबत .
मग अजून काय पाहिजे,
माझ्याशिवाय कोण नाही तुझं ,
मित्र कुठपर्यंत सोबत राहतील ,
दिवसा की रात्री ,त्यांना त्यांची कामं नाहीत का ,
कोण रागावले असेल तर बघ ...
ऐकून  घेतील ,
नाही ना ,
नाती काय करायची तुला ,
कोणता आनंद आहे ,नात्यात  सांग मला ,
असं  रंग उडल्यागत नको करू ,
भानावर ये , सांगतो ऐक गपचूप ,
सोडावे लागते सगळे हे ,
शरीराच्या उठणाऱ्या कळाहेत कळा,
उठतात तर उठू दे ,
पालव्या सारख्या फुटतात तर फुटू दे
खुडल्या जातील तोडल्या जातील
अगदी अगदी जाळल्या जातील
जळाल्यातर जळू दे
स्वतःला थोडं कळू दे
या सूर्याला अजून थोडं ढळू दे,
भावनेला वळायचे तसे वळू दे
लोक म्हणतील नालायक
म्हणले तर म्हणू दे ना
तुला काय त्याचे ,
मान पाहिजे का तुला
कश्याला हवा मान
काय खार घालायचा  मानाचा
तुला द्यायचा तर दे ,द्यायला काय कमी नाही ,
मान नाही पाहिजे मला तू असला की बस झाले
मी आहे तुझ्या सोबत ,
मला काही पण बोल तू ,
मला राग नाही ,
तू रागावला माझ्यावर ,
जसे तुझ्यावर रागावतात ना ,
तसाच तू माझ्यावर रागावतो आहे,
त्यांचे सोड ,
बघ माझ्याकडं बघ ,
दिसतो का तुला , नाही ना ,
नाही दिसणार मी कुणालाच , अगदी तुलाही ,
नेहमी बोलत राहीन तुला ,
पाठ नाही सोडणार ,
नाते बिते सोड ,
अन हो मोकळा ,
जग दाखवतो तुला ,
एकटं जग एकटं ,
भेटलच कुणी तर बोल जरा ,
पण खबरदार , मोहात पडशील तर ,
नाते कोणतेही  असो , कायम राहील ना राहील ,
पण आधीच सांगतो ,
माझ्याशिवाय मरेपर्यंत कुणीच नसणार ,
तू मलाही दूर लोटू शकणार नाही त्यांच्या सारखे ,
त्यांनी लोटले ना , तुला नाही जमू शकणार ,
असा अगाध ज्ञान मिळाल्या सारखा गप्प का झाला ,
अजून बरंच राहिले ,
पाहिजे तस राहा कुणाला काही बोलू नको
तुला नाही बोलता येत ,
मग जातात ते हसून तुझ्यावर ,
गप्प राहायचं ,
वाचायचं मस्त शांत रहायचं
डोळे मिटून उगाच बघायचं
गालात हसायचं ,
हसणे रडणे तुला आवडले ,
मला तर काहीच आवडत नाही ,
तुला सुंदर दिसायला आवडत होतं ना ,
बघ 2 महिन्यापासून तू कसा राहतोय तुला माहिती तरी आहे का ,
उठतो अंघोळ करतो ,
जेवतो , शेतात काम करतो ,
अंगावरचे कपडे बघ मातीनं भरलेत
माहिती पण नाही तुला तर ,
कुणी बघितलं का तुझ्याकडे .. कळले का तुला ,
नाही ना , बर झालं नाही कळले ,
हसत होती तुला ,
काय काय बोलत होती ,
पण तुला माहिती नव्हते ना ,
बरंच झाले ,
असंच रहा ,
तू कसाही असला तरी मला आवडतो ,
मस्त जेवत जा ,
तुला  जग दाखवतो ,
या रानात , पानाफुलात ,
या प्रत्येकात जगायचं शिकवतो तुला ,
ही नाती गोती सोड ,
पाखरं घरटं का सोडतात माहितेय का ,
कळेल कळेल ,
ते नाती गोती मानत नाही ,
जगतात हवं तसे मनमुराद ,
तुला ही जगायचं तसेच ,
मी आहेच तुझ्या सोबत ,
काही काळजी नको करू ....

-धनराज भुमरे
८-८-२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा