#सावली....
शुभ्या लिंबाच्या झाडाखाली बसून मोसंबी सोलतच होता की कुणीतरी येतंय कळताच त्याने पटकन 3 मुसुम्ब्या गवतात टाकल्या ....
तिकडुन आमल्या येताना दिसला अन पुन्हा वाकून गावतातली एक मोसंबी उचलून सोलायला घेतली. अंगठ्यावर जोर देत..."त्यो अजून आला न्हाय का"
दहा पावलावर आलेल्या आमल्याचं उत्तर .. "त्यो गेला फाट्यावर म्हातारीच काम करायला, लैच लाडका त्यो म्हातारीचा , म्या सटकलो तिथून त्यो यईल मागून"
शुभ्याच्या जवळ येऊन , "मला दि आर्धी"
शुभ्यानी गावताकडे बोट दाखवत "दोन तीन हे, घे तिथून"
आणि फोडलेली मोसंबी खाऊ लागला.
आमल्यानी पण मोसंबी सोलायला सुरवात केली "म्हातारीचं पोरगं शहरातून येत महिन्याला अन दिप्या ला पण काहीना ना काही घेऊन येतं "
शुभ्यानी तोंडातला चोथा थुकून "हा जाऊदि, काटा काढ लय दुखायला "
आमल्या " कोणता खुडला रे"
शुभ्या "भाभळीचा, रामभाऊ च्या बागातुन आणल्या, येतानाच खुडला पांदीत "
आमल्या " बर बर काढतु थांब संपू तर दि आधी"
दोघांनीही मोसंबी खाऊन घेतली अन शुभ्या नी बुड ठेकवलं, उजा पाय उडघ्यावर घेतला .
आमल्यानी सदऱ्याची पिन काढली अन तो पण खाली बसला .
तोंडातला थूका उज्या हातानी शुभ्याच्या टाचीला लाऊन चोळू लागला , जरा भिजल्यावर काटा दिसावा म्हणून नखानी खाजल्यासारखं करून दातात दाबलेली पिन घेऊन उकरू लागला ,
काटा खोलच रुतला होता .
शुभ्यानी डावा हात घोट्यावर तर दुसरा हात पोटरीवर घट्ट केला ,
आमल्या काटा काढायच्या धुंदीत होता , पिन आत टोचली तसा शुभ्या हुस्स करू लागला ,
काटा काढला रक्त निघालं ...
पण पाणी काही निघाले नाही डोळ्यातून .
आमल्यानी हात सदऱ्याला पुसला,
शुभ्या काटा खुडला होता तिथं दाबत होता ,रक्त येणे बंद होऊन त्याजागी पाण्यासारखं दिसायला लागलं .
इतक्या वेळात बाजूने झाडी असलेल्या कच्च्या रस्त्याने चालत दिप्या फाट्यावर पोहचला,
रस्ता जरा ओलाच होता सकाळी पाऊस पडून गेला 11 वाजले तरी सूर्य काही दिसला नव्हता , बैलगाडीच्या चाकाची निशाण ताजी दिसत होती ,
गावाकडून येणारा दिप्या डाव्या हाताला वळून वडाच्या सावलीत येऊन उभा राहिला वड चांगलाच मोठा होता,
वडा खाली लागूनच छोटीशी हॉटेल होती , एका बाजूला गुरांना पाण्यासाठी चांगलाच हौद होता त्यात पाणी एक दिवसाआड आप्पाच भरायचे ,
त्यांची ती हॉटेल मोक्यावर होती
आत दोन बाकडे होती, पाचेक माणसे बसतील अशी ,
बाहेर रांजण ठेवलेला त्यात प्यायचं पाणी
अन दुसरा रांजण आतमधी होता मागच्या कुडाच्या डाव्या कोपऱ्यात अन समोर लाकडी टेबल तीन बाजूने पोतं फाडून त्याला खालपर्यंत झाकून घेतलेलं, टेबलावर रॉकेलचा स्टोव ,
आप्पानी गावातल्या पोरांना हाताशी धरून हॉटेल च्या पुढं वडाच्या खोडाभोवती दगडं रचून उंचीला दोन अडिच फूटाचा गोल वटा तयार करून घेतला होता वट्याला मातीची भरती होती ,
रोज सकाळी हॉटेल समोर सडा टाकताना त्या वट्यावर पण टाकायचा हा आप्पाचा नित्य नेम,
दिप्याने नजर फिरवली आत कुणी नव्हते ,
बांदावर बैलं सडक लावून दिलेली होती , गळ्यातल्या घंट्याचा आवाज येत होता , एक गाय पण होती तिच्या घंटीचा आवाज कमीच येत होता ,
जरा बाजूला येऊन मोठ्याने आवाज दिला, " आप्पा "
आप्पा हॉटेलच्या माघे त्यांच्या शेतात बाजरीतले उपटगवत काढत होते याने बैलाला संध्याकाळची वैरण ही व्ह्यायची अन रान ही जरा रिकामं व्ह्यायच , त्यांनी दिप्याचा आवाज ओळखुन बाजरीतून आवाज दिला ,
" काय रे थांब आलोच "
दिप्या "आज्जीने पाठवले "
इतकं बोलून तो वट्यावर बसला , वटाही थोडा ओलाच होता.
पाखरांचा आवाज कानावर पडत होता तसा तो टकामका वर पाहत होता ,
थोड्या वेळात आप्पा आले, अंगातली बन्यान घामानं ओली झालेली , हौदातल्या पाण्याने हात धुतला अन ओला हाताने चेहऱ्यावर फिरवत " बाकीचे न्हाय का आले , कुठं हिंडायला गेलीत "
दिप्या नी पटकन उत्तर दिले "ओढ्याकडे गेलीत मला पण तिकडेच जायचे आहे ",
आप्पानी माघे माघे यायचा इशारा केला अन ते हॉटेलात जाऊन ,
टेबलाखालून पिशवी काढून दिप्याच्या दिशेने धरली , " पाडू बिडू नको "
दिप्या " नाही आप्पा नेतो जशी दिली तशीच "
आप्पा " म्हातारीला सांग गनुदा या हप्त्यात येईल "
दिप्याला घाई झालेली तो गरबड करत " सांगतो सांगतो , येतो आता "
दिप्याने आप्पाच्या नजरेआड येऊन पिशीचं तोंड उघडलं त्यात २ पपया अन काही शेरण्या होत्या ,
दिप्यानी पिशवीच्या तोंडाला उज्या हातात पकडून इकडं तिकडं बघत झोपडीकडे निघाला ..
क्रमशः....
©धनराज भुमरे पाटील
२५/०८/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा