थर्टी फस्ट २०१८,
कॅलेंडर बदलतं पण दुःख, आनंद तेच असतात फक्त त्यांना नव्यापणाचा लेप द्यावा लागतो.
________________________________________________
संध्याकाळच्या टायमाला म्हशीची धार काढून इकडं तिकडं न बघता सरळ घरी दारात पाय टाकतच म्हणालो,
"वहिनी दूध "
वेदांशला घेऊन वहिनी बाहेर उभ्या होत्या "ते बघ कोण आलं "
हे ऐकून, वेदू गोड आवाजात "काका बोका आला, काका बोका आला "
दीड वर्षाचा वेदू लवकर बोलायला शिकला.
आम्हा काका पुतण्याचा लय धिंगाणा चालतो, त्याच्या बरोबर मी ही अगदी लहानच होऊन जातो.
लहान लहान मुलं असतात गोड,निरागस... अशी की सगळं दुःख विसरायला लावतात
बादली टेकली, फ्रेश होऊन वरच्या घरी गेलो, मम्मी भाजी बांधत होती अन पप्पा गप्पा मारत टीव्ही पाहत होते.
पप्पा म्हणले "अरे घरी मोटार चालू करायची होती , पाणी लावलं होतं घरी ..पण निसटले बिसटले का पहाय... जाय बरं ..काय झालं पहाय"
"बरं" म्हणून माघे फिरलो,
दुधाचा ३१ तारखे पर्यंतचा हिशोब अन उकड्याचं दूध देऊन आलो. चार्जिंगचा मोबाइल काढला, मम्मीकडुन पैसे घेतले अन तसंच शॉर्टकट पकडला अन मोबाईल मध्ये डोकावत मळ्याकडे निघालो, मळा अगदी जवळच...
खळ्यात पोरं काहीतरी करत होती.. "काय करताय रे.. अंधार पडला ना आता"
कुणीतरी "काई नई.. काई नई"
मी दुर्लक्ष केलं केलं ... एक तर मला झाली होती गरबड...
अन त्यात पाहिलं ते त्या नळीचं तोड चिरलं म्हणून घरी पाणी चढायला स्पेशर नव्हतं , इथंच गळत होतं सगळं,
मनात आलं अर्जुनची खबरबात घ्यावी.. पण हे सालं कधी फोन घेतं कधी नाही म्हणून त्याच्या गर्लफ्रेंड म्हणजे आमची होणारी वहिनी.... सोनू चा नंबर डायल केला
यांच्या प्रेमाची सुरवात होऊन तीन महिने झाले, यांचं काही बिनसलं की मला फोन यायचा..
मी आपला कबुतराची भूमिका घेऊन..
फोन वरूनच इकडचे तिकडे अन तिकडचे इकडे...त्यांचे संदेश पाठवायचं काम करत रहायचं..
डोक्याला शॉट... त्यो काय म्हणला अन ती काय म्हणली .. एवढंच , माझं काय चाललंय...काय नई .. ते कधी विचारलं न्हाय ह्यांनी.
अलीकडे तर हद्दच झाली दोघांना कॉन्फरन्स घेतल्यावर ते राजपूत भाषेत काय बोंबलायचे काहीच समजत नसे.
पावसासारखं काहीच थेंब अंगावर पडतात बाकी वाहून जातात तसं मला काही-काहीच शब्द समजायचे..
पार वैतागलो होतो राव पण नाईलाज होता.
मोबाईल च्या उजेडात नळी कापायला धाबडीतून आरिपान सापडून आणला,फोन व्हायब्रेट झाला ..समजलं फोन उचलला.
तिकडून "हॅलो.."
"हा हॅलो ...काय मग ...अर्जुनचा फोन बिन आला का न्हाय"
मोबाईल स्पीकर वर टाकून नळी कापायला घेतली
"हा आला होता, मी दवाखान्यात ऍडमिट होते "
"का हो.. काय झालं"
"जरा तब्बेत खराब झाली होती ...काय करताय, कसला आवाज है"
सुस्कारा टाकून "काय न्हाय , नळी कापतोय..."
"कशाला ?"
"चिरली होती...खराब झाली म्हणून"
"तुम्ही केलथा का फोन अर्जुन ला"
"हा ... केलथा ना... जास्त न्हाई बोललो नाही ..तब्बेत कशी आहे मग आता"
"हा ठीक आहे, आता घरी आले, काही काम होतं का"
मनात म्हंटलं "अरर म्या व्हाट्सअँप वर ब्लॉक मारलं म्हणून अजून राग धरून हाय वाटतं"
"नाही, काई नई, असंच लावला होता"
"बरं"
एवढं ऐकून मी कॉल कट केला.
काय हे ना हे उगाच भीतीला धडका घेण्यात काही अर्थ नव्हता..
नळी जोडल्यावर रबरट्यूब आवळलं... मोटर चालू केली.
दुकानातून ढेप आणेपर्यत २० मिनिटात टाकी भरली.
म्हशीला ढेप ठेवली अन लगेचच मोटार बंद करून ...
दुपारून ढोरांना खायला उसाचे पिल्लं(वाढे) अन काही गवत घेतलं होतं, हे माझं रोजचं काम.
ते म्हशीला जास्त, एक गाय अन दोन बैलांना सारखं सारखं टाकून कार्हूडीला अन वगारीला थोडं कमी कमी,
त्यांना सरेल अन पुरेल अशी वैरण टाकली
बाजूच्या खळ्यात पोरं शेकत होती, साडे सात वाजले थंडी वाढली, चला म्हंटलं थोडं शेकायला.
हायला यांचा तर सुमडीत कारभार चालु होता.
जी शेकोटी दिसत होती ती तर चूल होती, त्यावर भगुनं पण होतं.
"काय मग पार्टी करताय काय"
मग सगळ्यांनी एक सुरात "हौव"
"आयला लय मजा करता राव तुम्ही तर.."
रावड्या लगेच जोशात " हा मंग इशै है का कैइ, "
"भैय्या ला फोन लाव ना" हे ऐकल्यावर
"नंबर...नंबर"
लगेच छोट्या "चौल्याहत्तर सत्येचालीस"
बोलणं झाल्यावर फोन कट केला.
पार्टीची आयडिया अभिषेक दिली.
अभिषेक वर्ग १० वी, शुभम, जय ६ वी, रवी (रावडी), रोहित ८ वी आणि छोट्या ९ वी. यांच्यात पार्टीचं नियोजन झालं.
या छोट्याश्या पार्टीसाठी बरेच कुटाने केले यांनी.
जयड्या ने घरी सांगितलं आम्हाला चिवडा आणायचा है पार्टीला... जरा गोंडा घोळून घेऊन पैसे मिळवलेच.
छोट्या कडं होते म्हणून तो लगेच तयार झाला.
रावड्या ने पैसे द्यावे लागणार न्हाय म्हणून घरून सगळं सामान आणायचं कबुल केलं.
घरी आईला मी फुकटात हाय सांगून पार्टीसाठी छोटं भगूनं, पक्कड, आगपेटी, मीठ ,२ कांदे, थोडं तेल, टिन च्या डब्याचं झाकण, हलवायला पळी, एक 'ए-फोर' साईज चं पुस्तक ते जुनं होतं का नवं म्हणजे कोणत्या वर्गाचं होतं ते त्यालाच माहिती इ.सगळं घरून आणलं.
जमलेल्या पैशातून मॅगीची पाकिटं अन एक प्रवीण पुडी आणली.
आता पार्टी म्हणल्यावर नोटांनी चहा उकळून प्यायला ही माघं-पुढं पाहायचं न्हाय ... असं काय तरी असतं नै का?
रोह्या ने घरी पैसे मागून ही न मिळाल्याने, त्यानं लपवून ठेवलेल्या पैशातून गुपचूप पैसे काढले.
शुभड्या नी गोड बोलून आई कडून पैसे मिळवण्याचा पराक्रम केला
"चटका बसणं यै, व्हय मागं" छोट्या ओरडला
जाळायला खळ्यातल्याच काड्या अन इटा रचून तात्पुरत्या चुली भोवती थंडीमुळं सगळे स्वेटरात असून ही शेकायला घेरा करून बसले.
मला नवल ही वाटलं अन कविता सुचली म्हणून सगळ्यांचा फोटो काढायचं मनात आलं
"ये चला असंच बसा सगळे मी फोटो काढतो मग मस्त फोटो काढून फेसबुक वर टाकू"
सगळे फोटो काढायच्या हिशोबाने बसले चार पाच फोटो काढले
"रावड्या आता तू फोटो काढ"
रावड्या असा उठला जसं काय म्या कायमचा मोबाईल देण्याचं जाहीर केल्यागत कुणी घ्यायच्या आत झेप घेतली, मोबाईल घेतला अन काढले फोटो तीन चार..
मोबाईल घेऊन पाहिलं "च्यायला बोट आलं मधी,चांगला काढ रे"
अभि "नीट काढ ना रे फोटू"
उठलो मोबाईल कसा धरायचा हे नीट सांगून पून्हा पोजिशन मधी आलो.
रोह्या "रावड्या भाय.. आता नीट काढ... न्हाईतर तोहा फोटूच येऊ देणार नाही"
छोट्या "ये नित काढ बलं का"
"ये गपा रे,काढतोय ना तो ..आता रावड्या नीट काढ न्हायतर पहाय मग" मी जरा दम दिला.
फोटो काढले पोरांच्या चेहऱ्यावर आनंद उजळून निघाला होता.
अर्धी मॅग्गी तयार झाली होती दुसऱ्या टप्यात बाकीची बनवायची होती,
खिश्यात फक्त ढेपीचे कालचे पाच अन आजचे पाच चिल्लर पडेल म्हणून दहा ची नोट " हे घ्या दहा रुपये मला पण घ्या रे तुमच्यात."
आता म्या दिलेल्या दहा रुपयाचं कुरमुडे आणायचे का मॅग्गी की अजून दुसरं काही ह्या प्रश्नावर ...त्यांना वाटलं इजा एक जण वाढला म्हंजे आता पुरेल का न्हाय म्हणून या शंकेने, विधानसभेत चर्चा झाल्यासारखं एकमताने मॅग्गीच आणायचं ठरलं.
तिकडं मधूमालती कार्यालयात मोठ्या आवाजात गाणे चालू होते, गजू काका काम असतात तिथं तिथली व्यवस्था बघायला,
तिकडं मोठ्या लोकांची पार्टी चाललीये असंच वाटत होतं.
अभ्या नी रावड्या कडून जोड पान घेतलं, अन दोघे झाकणातली तयार मॅग्गी पॅक करून, भैय्या नि सांगितल्या प्रमाणे ती मॅगी त्याच्या गाडीत नेऊन ठेवायला गेला.
रावड्या मॅग्गी घेऊन आला पण अभि येईना म्हणून होमगार्ड संतोष चे सुपुत्र जयड्या अन सोबतीला रावडी घेऊन मोहिमेवर निघाला.
अश्या वेळी एखाद्या मित्राला घरून बोलवून आणायचं म्हणजे घरच्यांच्या प्रश्नांना किती तोंड द्यावं लागतं अन कसं बोलायचं हे मित्रांना बरोबर माहिती असतं.
मी आपलं मोबाईल मधी कविता लिहण्याच्या नादात असताना.
शुभम कानात मच्छरासारखं भुन भुन करायला लागला, तंद्री भंग म्हणून त्याच्यावर खेकसलो ...
जयड्या, रावडी दोघे परत आले त्यांनी सांगितलं आभि नंतर येणार आहे.
आम्ही वाट पाहत होतो ,
अभि न्हाय पण अभिचे पपा येतांना दिसले.
अहो माझ्यासाहित सगळ्यांचे इंडिकेटर लागले हो ...
का नाही लागणार चुलते म्हणजे वडिलांसारखेच.
आम्ही सगळे त्यांना नाना म्हणतो , 'अशोक दादा' हे शुभम चे पप्पा ते रागावतात, नेहमी मोठ्याने खवळतात... याची पोरांना सवय झाल्याने त्यांना जास्त भीत नाही, अशोक दादा पेक्षा लहान रोहित चे पप्पा 'दिलीप भाऊ' अन सगळ्यात लहान 'संजय नाना'.
नाना अगदी शांत मोजकंच बोलतात पण रागावले तर ते बोलताना असं वाटतं की पाठीला उशी लावून गपागप बुक्क्या मारत आहे..
जवळ आले मुद्रा पाहून समजलं पार्टीचं भांडं फुटलं आहे ,
"करे ये... काय ... चला व्हा घरी" फक्त एवढंच बोलले
रोह्या अन शुभ्याला भीतीनं थांबावं की पळावं हे न समजल्याने नुसतं बघत होते.
छोट्या हा चुली पाशी होता तो तसाच राहिला, चटका बसला तरी हु का चू नसती केली त्याने.
जयड्या अन रावडी उठून मह्या बाजूला येऊन बसले, आम्हा सर्वांची हीच अवस्था झाली होती,
"व्हता का नै.... घरी" जरा मोठ्या आवाजात.
शुभ्या अन रोह्या असे गायब झाले की मागं वळून पण पाहिलं नाही.
"नाना मी आहे ना मॅग्गी तर बनवली आहे" असं मी बोलणार होतो पण ओठांनी साथ दिली नाही कारण एकच की पोरांना आतापासूनच पार्टीची सवय लागली मग घ्या काय...?
नंतर नानाही गेले उरलेल्या सर्वांनी सुस्कारा सोडला.
तसं वस्कन रावड्या "मायला वारा ...हे सगळं जयड्या मुळं झालं"
"ये म्या काय ..?" जयड्या नी एवढंच माझ्याकडं पाहून, हात चोळत म्हंटलं
"नाना बाहेर गेले की येतील बरोबर....थांबा दरशिक" दिलासा दिला.
छोट्या अन रोह्या दोघे मॅग्गी बनवायचं काम करत होते अन रावड्या मधी मधी करत होता कांदा बिंदा कापून दिला होता.
आता एकटा छोट्या बघत होता त्यानं भगुणं पकडीत धरून खाली घेतलं.
थंडीचा विसर पडला चूल मंदावली.
रावड्या तक्रार करत "काय गरज होती घरी जाऊन मोठ्यांनी हाक मारायची"
जयड्या चा चेहरा पडला तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.
"सगळी मॅग्गी झाली का तयार..? "
छोट्या हौव म्हणाला मग त्याला आवरायला सांगून आम्ही .. अभ्या, रोह्या अन शुभ्याची वाट पाहत बसलो.
एकाचीही इच्छा होत नव्हती मॅग्गी खाण्याची .
१०मिनिटं झाली तरी कुणाचं आलं नाही. फेकून कशाला द्यायची म्हणून जास्त गार व्हायच्या आता खावं तर लवकर एकही घास घ्यायला कुणी पुढं झाले नाही. माझ्या सांगण्यावरून त्यांनी खायला सुरवात.
माझी तर मुळीच इच्छा नव्हती पण यांना सरणार नाही मग वाया जाईल म्हणून अन पहिल्या टप्पातच टेस्ट करून पाहिलं होतं. तो चविष्ट स्वाद अजूनही जिभेवर होता मग मी ही सुरवात केली बघता बघता बरीच संपली, मी सगळ्यांच्या आधी हात धुवून लिहलेली कविता सेव्ह केली.
तिकडून अगदी शांत पावलं टाकत भैय्या आला हा रोहित चा मोठा भाऊ अमोल
"काय मग तुमची पार्टी फिसकली " हसू लपवत तो म्हणाला
"खाय ना भैय्या, अभ्या अन ते काहून नै आले"
मी त्याला मॅग्गी साठी आमंत्रण देऊन विचारलं
"नाना लय खवळले त्यांना, घरी सांगितलं नाही ...काही नाही... बसले घरीच आता"
तेवढ्यात शुभ्या आला पळत पळत "मला राहिली का नै"
रावड्या,छोट्या,जयड्या "है अजून "
रोह्या अन अभि सोडून सगळ्यांनी खाल्ली.
आता काहीच राहील नव्हतं तर अमोल अन शुभम घरी गेले नंतर जयड्या अन छोट्या गेला,
मी मोबाईल टॉर्च लावून दिला रावड्यानी त्याचं सामान उचललं. मी पुन्हा एकदा वैरण टाकून रावडी ला घरापर्यत सोडून आमच्या घरच्या शेजारीच अभिच्या घरी पोहचलो.
अभि उशीत डोकं घालून झोपला होता.
'चच्ची' (आमची आज्जी) "धनु तू होता का तिथं ..यांनी सांगितलं असतं तर संजू काही बोलला नसता"
"हौव... होतो मी खळ्यातच ...पण नाना आले त्यांच्या पुढं मी काय बोलणार..."
अभि ची मम्मी "राग आला होता त्यांना, सांगून गेले नव्हते ना... आधीच याला सर्दी झालेली, रुसून बसला आता"
"हौव आंटी.. मला पण हेच वाटलं की आतापासून पार्ट्यांची सवय लागली म्हणजे पुढं जड ..." बोलणं अर्धवट सोडलं
"अभिनं काही खाल्लं पण नाही"
विषय बदलावा म्हणून मोबाईल मधले फोटो दाखवले अन कविता ही ऐकवली, बैठकीत सगळ्यांनी गराडा घातला ...
आजीने प्लेट मध्ये चिवडा अन पपई ची फोड अभिसाठी आणली होती पण अभि उठून दुसऱ्या खोलीत जाऊन बसला.
नेमकी कोण म्हणलं कळलं नाही पण सांगण्यावरून मी अभि साठी ती प्लेट घेऊन अभिजवळ बसलो सगळं खाई पर्यंत.
वाटलं आता पार्टीची पूर्णता झाली.
सगळं शांत झाल्यावर वहिनीने जेवायला बोलवलं, घरी गेलो हात धुतला अन नेट चालू होतं थर्टी फस्ट चे मॅसेज चा पाऊस पडत होता रिप्लाय तर देऊ शकलो नाही पण मोबाईल मध्येच गुंतलो ..
वहिनीनं फोन हिसकून घेतला "ताट केव्हाचं वाढलं, धरा ह्यो फोन... आधी जेवून घ्या,मग बसा कविता करत"
सगळ्या कवी, लेखकाचं होतं तसंच माझं ही झालं,
घरात सतत बोलणे बसतात पण कधी नाराजीचे सूर नसतात. काळजी साठी बोलतात, हे सर्वांचे प्रेमच असते.
लिहण्याचा प्रयत्न करतो जे काही लिहतो ते सर्वांचे प्रेम मिळाल्या मुळेच शक्य होतं.
जेवण केलं, वरच्या घरी जाऊन मेथीच्या दोनशे/तीनशे जुड्या धुतल्या, चार्जिंगहुन फोन काढला पाहिलं तर काय ११:२० झालेत.
मग आत्याने त्यांच्या शेतातल्या बागेचे चांगले मोठे मोठे
डाळिंब पिशवी भरून आणले होते, टीव्ही पाहताना त्यातलं एक खायला लागलो
मी काल घरी नसताना म्हणजे रविवारी औरंगाबाद ला कविसंमेलनासाठी गेलो होतो.
तेव्हा गेवराईच्या आत्या-काका अन काका/काकी, छोटा भाऊ विशाल 10th class, ऎशु MBBS च्या शिक्षणासाठी लातूर असते काही दिवसाची सुट्टी असल्याने ती पण येऊ शकली.
हे सर्व औरंगाबादहुन सोबतच कार ने घरी आले कारण असं की राधकीसन नाना यांची मुलगी म्हणजे आमची आत्या या देवाघरी जाऊन काहीच दिवस झाले तर भेटण्यासाठी आले होते.
टीव्ही चालूच होता,छोटे सुरवीरांचे सुमधुर आवाजात गाणे ऐकत मनाचं विचार चक्र सुरू झालं..
आज थर्टी फस्ट मग काय कुणी प्रेमिके सोबत, कुणी घरी साजरा करत असेल, कुणी मित्रांसोबत तर कुणाला याचं काही देणं घेणं नसल्यासारखं जेवण करून मस्त झोपले असतील.
सगळीकडेच आनंद उत्सव सुरू असेल असे नाही.
सीमेवर रक्षण करणारे जवान, दुष्काळामुळे शेतकरी मरणाच्या दारात, कर्ज, दुष्काळ, याने पिचून गेलेला शेतकरी, बेरोजगारीने बेचार झालेले तरुण आणि
थंडीमुळे गारठलेले गोर गरीब, ऊस तोडी वाल्यांचं तर विशेष कौतुक वाळलेल्या पेंढ्या लावून राहतात ती लोकं किती थंडी वाजत असेल ना त्यांना... काही काहींना तर हे ही नशिबात नसतं ...
कुठे अन्न फेकल्या जातं तर कुठं उपाशीच झोपावं लागतं ,
कॅलेंडर बदलतं पण दुःख,आनंद तेच असतात फक्त त्यांना नव्यापणाचा लेप द्यावा लागतो.
सरत्या वर्षाच्या काही आठवणी नजरेसमोरून गतीनं दिसत होत्या.
शाहिद झालेले जवान, शेतकर्यांच्या आत्महत्या ..
अलीकडेच माझे वर्गमित्र राजेश अन त्याच्याही आधी बालाजी हे असिडेंट अनंतात विलीन झाले.
असे अनेकांच्या घरातील कुणीतरी सोडून गेले असतील त्यांना मनोमन श्रद्धांजली दिली ,
सर्वांना मनोमन लढायचं बळ मिळो खास करून 'स्त्री' ला मनमोकळं जगता यावे.
स्वप्न पूर्ण करता यावीत अशी प्रार्थना करून शुभेच्छा ही दिल्या ..
नवा संकल्प तरी काय करावा...आपले काम चांगल्या पद्धतीने करूया ,लोकांना त्रास होईल असे वागायचं नाही बस...
हे सर्व मनात चालू असताना फटाक्यांचा आवाज ऐकू आला,
३१ डिसेंबर २०१८ चे शेवटचे बारा वाजले.
उठलो टीव्ही बंद केला अन डोळे मिटले मनात विचार सुरू असताना कधी झोप लागली समजलं ही नाही ..
©धनराज भुमरे पाटील, पाचोड
५ जानेवारी २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा